कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकात राज्यराणी एक्स्प्रेसला पार्सल थांबा मंजूर झाला आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात कोकणी मेवा, भाजीपाला व इतर साहित्य मुंबईपर्यंत ने-आण करता येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच राज्यराणी अप आणि डाऊन या गाडीला कणकवली स्थानकात पार्सल थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नारळ, आंबा, सुपारी या पिकांसह सिंधुदुर्गातील फरसाण, खाजे तसेच इतर छोट्या मोठ्या प्रमाणातील साहित्य मुंबईपर्यंत पाठवता येणार आहे. साहित्याच्या आकारमानानुसार राज्यराणी एक्स्प्रेसला जादा पार्सल डबेही जोडले जाणार आहेत. या सुविधेचा मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि छोट्या उद्योजकांना होणार आहे.
सिंधुदुर्गातून छोटे मोठे साहित्य ने-आण...
more... करण्यासाठी प्रवाशांच्याच बोगीचा वापर करावा लागत होता. यात रेल्वे गाड्यांना एक ते दोन मिनिटांचाच थांबा असल्याने सामान उतरताना प्रवाशांना मोठी धावपळ करावी लागत असे. आता राज्यराणी एक्स्प्रेसला पार्सल थांबा मंजूर झाल्याने पार्सल डब्यात साहित्याची चढ-उतार होईपर्यंत ही गाडी स्थानकात थांबून राहणार आहे.
पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह
कणकवली रेल्वे स्थानकात राज्यराणी एक्स्प्रेसला पार्सल सुविधा सुरू करताना, साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली, साहित्याची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी आदींची नियुक्ती अद्याप झालेली नाही. तसेच या सुविधांबाबतची कोणतीही माहिती रेल्वे स्थानकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे आजपासून राज्यराणी एक्स्प्रेसला पार्सल सुविधा सुरू झाली असली तरी त्याचा फायदा कसा घ्यायचा, असा प्रश्न प्रवाशांसह शेतकरी, बागायतदारांना पडला आहे.