सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात येणारा अंकाई ते दौंड 223 किलोमीटरचा सेक्शन पुणे विभागात विलिनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र याप्रकरणी अद्यापही गप्पच असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर विभाग हा सध्यस्थितीत 981.53 किलोमीटरचा आहे. दौंड ते अंकाई या सेक्शनचे 223 किलोमीटर अंतर कमी होवून आता 758.223 किलोमीटर होणार आहे. पुणे विभाग सध्या 531.15 किमीचा आहे. दौंड ते अंकाईचा समावेश झाल्यानंतर 739.42 किमी होणार आहे. त्याचबरोबर सध्या पुणे विभागात 70 स्थानके आहेत. तर विलिनीकरण झाल्यानंतर 94 स्थानके होणार आहेत. दुसरीकडे सोलापूर विभागातील स्थानकांची संख्या ही सध्या 85 आहे. विलिनीकरणानंतर 61 होणार आहे. याच मार्गावर अहमदनगर, साईनगर शिर्डी, कोपरगाव, बेलापूर, येवला या महत्वांच्या स्थानकांचा आणि इतर स्थानकांचा समावेश आहे. याचा मोठा आर्थिक फटका सोलापूर विभागाला बसणार...
more... आहे. दौंड ते अंकाई सेक्शन पुणे विभागात विलिनीकरण झाल्यास कर्मचारी, आरक्षित कोटा, विभागाचे नियंत्रण आदी सर्व बाबी या पुणे विभागातून हाताळण्यात येतील. केवळ 758.223 किमीचा विभाग होणार आहे. सर्व हालचालींना वेग येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी परिचालन, सिग्नलिंग, वाणिज्य, विद्युत आणि इंजिनिअरिंग विभागाशी चर्चा केली असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. सध्या सोलापूर विभागात असणाऱ्या येवला स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर कांद्याची लोडिंग होऊन निर्यात केला जातो. त्यामुळे सोलापूर रेल्वे विभागाला यातून मोठे उत्पन्न मिळते. त्याचबरोबर शिर्डीसारख्या प्रसिद्ध देवस्थानला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. सोलापूर विभागाची रेल्वे हद्द कमी झाल्याने होणारा विकास खुंटणार आहे. यामुळे आधीच विमानसेवा नसल्याने कोणत्याही कामासाठी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो. मात्र आता विभागातील 223 किमीचे अंतर कमी होत असल्याने याचा सर्वसामान्यांसह सर्वांनाच फटका बसणार आहे.
हेही वाचा: सोलापूर : शहरासह चार तालुक्यांना कोरोनाचा दिलासा!
काय होणार परिणाम
- आरक्षित तिकिटांचा कोटा पुणे विभागाकडे जाईल
- कर्मचाऱ्यांना पुणे विभागात जावे लागेल
- सोलापूर विभागाचे नियंत्रण न राहता पुणे विभागाचे येईल
- उत्पन्न मिळणाऱ्या स्थानकांचा असणार समावेश
लोकोशेडची प्रतीक्षा
दौंड येथे 200 कोटी रुपये खर्चून विद्युत लोकोशेड बांधण्यात येत आहे. याठिकाणी रेल्वेचे जवळपास 500 कर्मचारी करतील. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराचा विकासदेखील यामुळे होणार आहे. मात्र आता दौंड हे पुणे विभागात समाविष्ट होत असल्याने विद्युत लोकोशेड देखील पुण्यात जाणार असल्याने सोलापूर विभागात कुठे लोकोशेड असणार याची आता सोलापूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दौंड ते अंकाई हे पुणे विभागात विलिनीकरण होत असल्याने प्रशासकीय सुधारणांमध्ये वाढ होणार आहे. दौंड ते अंकाई हे पुण्यापासून जवळ असल्याने काम करणे सोयीस्कर होणार आहे. रेल्वे प्रशासन घेत असलेल्या निर्णयाला पाठिंबा आहे. सोलापूर विभागातील सेक्शन पुण्यात समाविष्ट होत असला तरी यावर नियंत्रण हे मध्य रेल्वे मुंबईचे असणार आहे.
- शामसुंदर मानधना, सदस्य, लातूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे मुंबई