कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसमध्ये खडखडाट
मिरज - कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस आज अवघ्या पंचवीस प्रवाशांसह धावली. सोलापुरातून येणाऱ्या एक्स्प्रेसमध्येही फक्त पन्नास-साठ प्रवासी होते. दोन वर्षे दिवसा धावणारी एक्स्प्रेस रात्री सोडण्याच्या निर्णयाचा फटका पहिल्याच दिवशी बसला. दररोज सुमारे चार हजार प्रवाशांची ने-आण करणाऱ्या गाडीत आज खडखडाट होता.
प्रवाशांचा तीव्र विरोध असतानाही ही गाडी आजपासून रात्री सोडली. कोल्हापूर-सोलापूर आणि सोलापूर-कोल्हापूर या गाड्या दिवसा धावत होत्या. पाय ठेवायलाही जागा नसणाऱ्या या गाड्यांनी वर्षांत आठ कोटींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले. तरीही त्या रात्री सोडण्याचा अनाकलनीय निर्णय रेल्वेने घेतला. आजपासून त्या रात्री धावू लागल्या. कोल्हापुरातून ती रात्री 11.55 वाजता आणि सोलापुरातून...
more... रात्री 11.35 वाजता सुटली. रेल्वेचा निर्णय चुकीचा असल्याचे पहिल्याच दिवशी प्रवाशांनी दाखवून दिले. कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेससाठी फक्त दहा प्रवाशांनी आरक्षण केले. 247 आसनांचा कोटा असताना रात्री आठ वाजेपर्यंत त्यात 237 जागा शिल्लक होत्या. तत्काळचा 151 आसनांचा कोटा पूर्णपणे शिल्लक होता. जनरल बोगीतून तीस ते चाळीस प्रवासी गेले. त्यामुळे सुमारे दीड हजार प्रवासी वाहून नेणारी गाडी आज अवघ्या पन्नासभर प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे रवाना झाली. वातानुकूलित तीनही बोग्यांत तर एकही प्रवासी नव्हता.
सोलापूर- कोल्हापूर एक्स्प्रेसची अवस्थाही अशीच होती. 238 पैकी 208 स्लिपर आसने रिकामी होती. तीस प्रवाशांनी आरक्षणे केली होती. 452 आसनक्षमता असणारे स्लिपर कोच खडखडाट करीत धावले. पाच तासांच्या प्रवासासाठी रात्रीच्या या एक्स्प्रेस गाड्या आता सहा ते सात तास घेणार आहेत. त्यांना मिरज, पंढरपूर स्थानकांत अर्धा ते एका तासांचे नाहक थांबे मिळणार आहेत. मिरजेतून सोलापूरसाठी दिवसा ऐंशी रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी आरक्षण करून 160 द्यावे लागणार आहेत. पंढरपूरसाठी 135 मोजावे लागतील. रेल्वेचा हा निर्णय चुकीचा असल्याचे प्रवाशांनी आज पहिल्याच दिवशी दाखवून दिले.